Tuesday, 6 November 2018

आमची बाबा दिवाळी अशीच असते

नमस्कार मंडळी,
झाली का पहिली अंघोळ? मित्रांनो, काल बाजारात भलतीच रोषणाई होती, कमालीचा उत्साह होता. सगळं पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

वर्षभर ना घरका ना घाटका असणारे आम्ही 'मध्यम वर्गीय' या आठवड्यात राजेशाही थाटात जगण्याचा प्रयन्त करतो. होय फक्त प्रयत्नच. दिवाळी जवळ आली कि सगळ्यात पहिली खरेदी होते ती कपड्यांची. 'माझ्या बहिणीनी दिलेल्या साडीची घडी मोड, आणि तुला कशालारे लागतात नवीन जीन्स दर वर्षी. एक टी-शर्ट घेऊ' हे माझ्या बाबांचे दिवाळी ब्रीदवाक्य. मात्र खरेदीला गेलो की टी-शर्ट, जीन्स  आणि साडी तिन्ही घरात यायचं. त्यांनी घरचा शर्ट ड्राय - क्लीनिंग करून घातला हे आता उमगते. चुकून मी सायकल किंवा आईने दागिना मागितलाच, तर प्राइव्हेट कंपनी मध्ये #Bonus नसल्याचं रडगाणं बाबा का गायचे हे आज मला कळतं.

फराळाची रेल-चेल असायची. चकल्या पाडायला बाबा मदत करायचे तर पोहे वाळवणं माझं काम. चकली चिवडा, भस्मासुर लाजेल असं हाणायचो. आमची मजल मात्र बेसन लाडूं पर्यंतच. काजू-कतली दिसली कि शेजारच्या गुजराथी काकू अथवा बाबांची कंपनी प्रसन्न झाली हे आम्ही समजून चुकायचो.
'मराठा तितुका मेळवावा म्हटलं, तो हा दिवस पहायला का?' आमचा किल्ला पाहून  शिवाजी महाराजांनी  नक्कीच आम्हाला ठणकावून जाब विचारला असता.

सुतळी बॉम्ब कधी मला मिळालाच नाही. लहान आहेस असं सांगून, नंतर घोडा झालास असं सांगून. मी मित्रांचे ढापायचो म्हणा. माळ लावणे हि संकल्पनाच आम्हाला मंजूर नाही . लावायच्या त्या सुट्ट्या केलेल्या लवंगीच. दिवस यायचा नरकचतुर्दशीचा. पहिला फटाका आपला असावा या जिद्दीने ४ वाजता सगळेच उठायचो. लाइफबॉयने रागडलेल्या अंगाला अचानक मोती अथवा मैसूर-सॅंडल रुपी सुखद धक्का मिळायचा. नारळ तेलाची जागा बदाम तेल व उठणं घ्यायचं. तुकडा बासमती अख्खा व्हायचा.

आज काळ बदलला, चार अतिरिक्त पैसे घरात आले. पण खरं सांगायचं तर आपण 'मध्यम वर्गीयांची' दिवाळी काही औरच असते. दिवाळी म्हणजे नुसता एक सण  नसून, दिवाळी म्हणजे आनंद, दिवाळी म्हणजे अनुभव हे बहुधा फक्त आपल्यालाच कळलं. या निमित्ताने आणखी एक कबूल करावंसं  वाटतं. मध्यम  वर्गीय असल्याची लाज वाटता काम नये. किंबहूना त्याचा अभिमान वाटायला हवा. 'होय आम्ही मध्यम वर्गीय आहोत, आणि आमच्या सारखे सुखी आम्हीच'.

आपणा सर्वांना दिवाळी सुख-समृद्धीची व भरभराटीची जावो  हीच सदिच्छा. म्हणून काय लगेच काजू-कतलीची अपेक्षा करू नका 😃

No comments:

Post a Comment