Saturday, 9 December 2017

एकदा पहावं करून

नमस्कार मंडळी,
आजचा माझा लेख माझ्या विवाहीत व विवाहेच्छूक मित्र मैत्रिणींसाठी आहे.
हो, हो...२१ नोव्हेंबर रोजी माझं गंगेत घोडं न्हालं. लग्नानंतर प्रथमच तुमच्या भेटीला येतोय.

'घर पहावं बांधून आणि लग्न पहावं करून', असं का म्हणतात हे उमगलं बुआ.

हॉल, मेनू, कपडा-लत्ता, फोटोग्राफर  सगळे धार काढून बसले असतात. 'नमस्कार' म्हणतात तेव्हा बहुतांश वेळेला, 'आला बकरा' म्हणत असावेत मनात. पण लगीनघाईची आपली एक वेगळीच मजा आहे. 'कशाला उगाचचा खर्च, आणि लग्न एकदाच होतं' यात माझ्यात आणि माझ्या प्रिय पत्नी पूजा मध्ये बऱ्याचदा वाद मिश्रित चर्चा झाल्या. मं आम्ही काय केलं? आम्ही केली तडजोड. तेव्हा समजलं लग्नाचं दुसरं नावच आहे 'तडजोड'.


धागा ताणल्याने तुटतो हे कळायला आम्हाला वेळ लागला नाही. या धाग्याला गैरसमजुतीचा गाठ बसू द्यायची नाही  हे आपण पक्कं ठरवूया. बाप्पाच्या कृपेने कार्य निर्विघन पार पडले आणि पूजा आमच्या घरी आली. दुधात साखर मिसळावी अशीती रुळली. विचार आला, किती कठीण असतं दुसऱ्याचा घराला आपलं म्हणणं. तिथल्या रीती, रिवाज पद्धतींना आपलास करणं . हि शक्ती निव्वळ स्त्री मधेच. तिला मान सम्मान आणी दर्जा देणं  हे आपलं माफक कर्तव्य.


आज सकाळीच आम्ही भांडलो ति वेगळी गोष्ट. भांडायचं ओठातून, प्रेम मात्र मनातून करायचं. चार कौतुकाचे शब्द आणि एखादं गिफ्ट, बस्स अजून काय हवं असतं. जमतील त्या सर्व इच्छा पूर्ण करून भरपूर जगण्याचा प्रयत्न करूया की .

लग्नाचं नातं थाटात जोडावा कि साधेपणाने हा ज्याचा त्याचा प्रश्न, पण कोणाचंही नातं कोर्टाच्या पायरीवर तुटू नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
नसलेली चूक कधीतरी कबुल करावी, साथीदाराला वाद जिंकू द्यावा, आपण फक्त मन जिंकावं, निंदा करावी पण प्रेमाने...आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे विश्वास. नात्यात प्रेमाहून अधिक प्राधान्य विश्वासाला द्यावे असं मला वाटतं.

जाता जाता एक वैधानिक इशारा माझ्या अविवाहित मित्रांसाठी:
प्रेयसी जेव्हा बायको होते तेव्हा तिच्यात अमुलाग्र बदल होतो... चांगला कि वाईट??

हे जाणून घेण्यासाठी लग्नाचा लाडू अवश्य खा !!!