Tuesday 4 September 2018

आपली मूर्ती आपणच बनवा

श्रावण महिन्याचा उत्तरार्ध येताच मनाला वेध लागतात ते बाप्पाच्या आगमनाचे. यंदाही काहीतरी 'हटके' मखर करायचा ठरवलं. थर्मोकॉल चा वापर टाळणार व मूर्ती देखील घेणार ती शाडू मातीची हे निशचित केलं. इतक्यात सहयोगाने माझी नजर पडली एका पाटीवर, 'आपली मूर्ती आपणच बनवा'. गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली व पर्यावरण दक्षता मंडळ, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्दमाने हि कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. क्षणाचाही विलंब ना करता मी नाव नोंदविले. मला हि अनोखी संधी दवडायची नव्हती. पहिला दिवस होता, मूर्ती घडविण्याचा. सृष्टीच्या निर्मात्याला साचेबदध करण्याचा, निराकाराकाला आकार देण्याचा. हा टप्पा सोपा नव्हता. अत्यंत बारकाई माती मळत, मोडत, तोडत, जोडत हे कार्य संपन्न झाले. दिवसाखेरीस आपला बाप्पा पाहून मला आनंदाश्रू आवरेना. निर्मितीचा आनंद काही औरच असतो.
एक आठवड्या नंतर दिवस आला रंगकामाचा. प्रत्येकाने कल्पकतेने बाप्पाला रंगविले.  शेला, उपरणं व दाग-दागिन्यांनी नटलेले गणराज पाहून मन प्रसन्न  झाले.  सर्वांच्या मूर्ती खूपच सुबक अन सुरेख घडल्या. पहिलेच वर्ष असल्यामुळे काही त्रुटी राहिल्या खऱ्या, पण मला वाटतं अपूर्णता हाच आमच्या मूर्तीची सर्वात सुंदर अंग होता. कलाकार म्हणून काय मेहनत लागते हे आम्हाला एव्हाना चांगलेच उमगले होते.
शेवटी करता-करविता तोच होता. आपण फक्त निमित्तमात्र. सोहम आर्टस् चे गुणेश सर व त्यांच्या सहकाऱ्यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभले. आता हा नेम मी मोडणार नाही. पर्यावरणस्नेहींची अशी कार्यशाळा  प्रत्येक शहरात राबवावी असं मला मनापासून वाटतं. 
।। गणपती बाप्पा मोरया ।।
।। आपली मूर्ती आपणच बनवूया ।।